Saturday, April 27, 2013

वाचनातून नजरेत आणि मनात उतरलेला "रारंग ढांग"


नुकतचं रारंग ढांग वाचनात आलं. आणि प्रभाकर पेंढारकरांची कथा मनाला भिडली, नुसती भिडलीच नाही तर खूप दिवस मनात घर करून होती.
लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे, याच्या भोवती फिरणारी हि कथा मानवी भावभावना, निसर्गाचा स्वच्छंदीपणा , आणि आर्मी असे अनेक पैलू उलगड नेते आणि शेवटपर्यंत वाचकाला गुंतवून ठेवते.
मुंबईला असणारी अति आरामशीर नोकरी सोडून विश्वनाथ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात हिमालयात रस्ते बांधणारे आर्मी इंजिनीअरींग कडे वळतो. हिमालयात रस्ते बांधणे हे अत्यंत जिकरीच काम. येथील लहरी निसर्गाचं वर्णन, त्याने मांडलेला उच्छाद इथून कथेला सुरुवात होते. विश्वनाथ च्या मनातील हिमालय आणि त्यानी अनुभवलेला हिमालय यांचं सुरेख वर्णन अधे मध्ये भेटत जात.
आणि मग ओळख होते अवाढव्य अशा "रारंग ढांगाशी". आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच उंच कड्यांना हिमालायात ढांग म्हटलं जात. असा हा रारंग ढांग सतलज नदीच्या दोन्हीबाजूंनी आकाशाला भिडलेला. या रारंग ढांगा तून रस्ता करायचं काम विश्वनाथ वर सोपवलं जात, आणि मग विश्वनाथ चा संघर्ष सुरु होतो हिमालयाशी, मुळातच "ब्लडी सिव्हिलियन्स" चा तिरस्कार करणाऱ्या मेजर बंबांशी, त्याच्या हाताखालील असणाऱ्या लेबर लोकांशी आणि नकळत स्वतःशीच.
विश्वनाथची रारंग ढांगाशी झालेल्या पहिल्या भेटीत त्याच्या मनातील एक वाक्य मला फारच अवडल आणि पटलं देखील - "आपल्या देशात माणसाच्या वेळेला किंमत नाही. आणि त्या पलीकड त्याच्या जीवनाला !"
कथेसोबत पुढे सरकतांना आपली वेगळ्याविध लोकांशी ओळख होत जाते. कॅप्ट्न नायर, मेजर अमर, कॅप्टन मिनू खंबाटा, सर्जेराव गायकवाड, विश्वनाथची मैत्रिण उमा. यातील विशेष भावतो तो मिनू.त्याचं स्वच्छंदी वागण, रसिक मन, बिनधास्त बोलण, वाचकावर तो एक वेगळाच ठसा उमटवून जातो.
अश्या या मिनुच एक वाक्य-"दोस्त, आता खरोखरच चढली. आता ओठांवर शब्द येतात ते डोक्यातून नाही. इथून, हृदयातून ! विशू, जीवन हे जगण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने जग. लुटता येईल तेवढा आनंद लूट. देता येईल तेवढ दोन्ही हातानी दे,आजच! उद्दाचं कुणाला माहित? ह्या रंगमंचावर प्रत्येकालाच एक दिवस पडद्याआड जायचं आहे! आणि ह्या बॉर्डर रोडवर तो दिवस कोणत्याही क्षणी उगवण्याची शक्यता असते… "
विश्वनाथ आणि उमाचं फुलत गेलेलं नात सुद्धा कथेला गुलाबी रंग लाउन जात. कथेमध्ये अनेक वळणावर मिळणारे अनपेक्षित धक्के, प्रत्येक प्रसंगाचं, माणसाच्या स्वभावाचं केलेलं अप्रतिम वर्णन, आणि उत्कृष्ट वाक्यासंपदा पुस्तक संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.
पण पुस्तक संपल्यावर सुद्धा एक वाक्य जीवनात कायमचं घर करून जात - "जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रहता है ?"

रारंग ढांग
लेखक- प्रभाकर पेंढारकर
मौज प्रकाशन
वाचलं नसल्यास जरूर वाचा दोस्त हो…


No comments:

Post a Comment